बुधवार, २६ जानेवारी, २०११

खिडकी

नेहरु फेस्टिव्हल मध्ये ज्योती सुभाष ह्यांच खिडक्या हे नाटक पाहिलं.आजी व नातवाच्या सुंदर नात्यावर कथा गुंफली आहे.नातवाच्या सुरेख आठवणींपासुन दूर जाणारी आजी व धडपडत असलेला नातू याचं सुंदर सादरीकरण केलेलं आहे.नाटकाचं शिर्षक खिडक्या आहे असं एकल्यावर मला आमच्या वाड्याच्या माडीवरची खिडकी आठवली.सागाच्या लाकडात सुंदर कोरीव काम केलेली,जमिनी पासुन थोड्याच उंचीवर असलेली थोडीशी बसकी अशी ती खिडकी खुप छान आहे.लहानपणी ना मल ती खुप आवडायची कारण फक्त त्याच खिडकीतुन खाली पहाण्यासाठी माझी उंची पुरायची.पण मग नंतर हळुहळू मला तो छंदच जडला आणि त्या छंदाच रुपांतर सवयीत झालं आणि मग तो नित्यक्रमच झाला.रात्री झोपण्याच्या आधी खिडकीत जाऊन चांदण्या बघायच्या आणि त्याने मन भरल की मगच खाली झोपायला पळायचं.खर सांगायचं तर 'ह्या' खिडकीशी माझ्या खुपशा आठवणी जोडलेल्या आहेत.त्या खिडकीतुन मी गणपतीच्या मिरवणूकी पाहिल्या आहेत,दिंडी,प्रभात फेर्‍या पाहिल्या आहेत,अगदी दंगलही 'त्या' खिडकीच्या फटीतुन बघितल्या आहेत.त्या खिडकीने माझी खुपशी दु:ख शेअर केलेली आहेत.कितीतरी वेळा माझ्या अश्रृंनी तिची सागाची पट्टी ओली झालेली आहे.जगाकडे नेहमी उघड्या नजरेने बघत रहा असं ती मला सांगतेय असच वाटायच मला.हे सगळ आठवल ना की गहिवरुन येत.पण मग कधीतरी मनात विचार येतो,की उद्या मोठं झाल्यावर,रुटिन मध्ये बिझी झाल्यावर,लग्न होऊन सासरी गेल्यावर,मला ह्या खिडकीची आठवण आली असती का?कदाचित नाही किंवा कदाचित माझ्या म्हातारपणात मी परत ह्या खिडकिकडे आलेही असते,पण मग तेव्हा वाटल असतं की आता फक्त चौकटी राहिल्यात आतला गाभा मात्र कधीच गळून पडलाय!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा