शुक्रवार, २३ डिसेंबर, २०११

सेन्सॉरचा नवा फंडा!


'कोंबडी पळाली' ह्या गाण्याचं हिंदीत रुपांतर झालयं हे पाहून खरचं खूप बरं वाटलं.अजय-अतुल ह्यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं आज बॉलीवूड मध्ये चिकनी चमेली ह्या गाण्याने प्रसिद्ध होतयं पण.....

हल्ली आयटम साँग्जची लाट आलीच आहे.संपूर्ण पिक्चरमध्ये एकही आयटम साँग नसेल तर तो पिक्चर म्हणजे 'अळणी' असचं चित्र सध्या दिसतयं.पण विचार करायला लावणार्‍या आणि बरोबरच मनाला खाणार्‍या गोष्टी घडतायेत एवढं मात्र खरं.सध्याचच उदाहरण घेऊया! चिकनी चमेली च्या व्हिडिओज अगदी न्युज चॅनल्सपासुन ते फेसबूक पर्यंत सगळीकडेच दाखवल्या जातायेत,हिट होतायेत,१०० लोकांचे लाइक्स येतायेत,त्यामुळे हे गाणं कोंबडी.. सारखच हिट होणार ह्यात शंकाच नाही,त्यातही कतरिना अगदी चवीने बघावं अशीच नाचल्यामुळे ते गाणं वाजणारचं.पण इथे एक गोष्ट मात्र स्पष्ट केली पाहिजे की जेव्हा तिने पेटवलेल्या काडीने ती तिच्या बरोबर नाचणार्‍या आर्टीस्टच्या तोंडातली विडी शिलगावते हा भाग एकदम 'ब्लर' करुन दाखवलाय.वा! केवढा हा सुज्ञपणा! प्रशंसाच करायला हवी ह्याची.ती विडी दिसायला नको(ती विडी आहे हे कळत असुनही) म्हणून ब्लर करण्याची काढलेली शक्कल वाखाणण्याजोगी आहे.कारण हे गाणं लहानांनपासुन ते थोरांपर्यत सगळेच बघणार त्यामुळे त्याचा परिणाम व्यसनाच्या रुपात व्हायला नको म्हणून घेतलेली ही खबरदारी असावी! मस्तच!
खर्‍या प्रश्नाची सुरुवात मात्र इथपासूनच होते,ती शिलगावलेली विडीची कृती मात्र ते व्यसन आहे,ह्या नावाखाली ब्लर करायची आणि ती शिलगावण्यासाठी काडी जिथून पेटवली गेली तो भाग मात्र उघड्या डोळ्यांनी पहायचा! वा! विडीची काळजी घेतली गेली पण त्या नाचणार्‍या कतरिनाचं काय? त्यात संजूबाबा ने खास आपल्या शैलीत दिलेल्या एक्सप्रेशन्स चं काय? ब्लर करायचा झाला तर जवळ जवळ सगळं गाणचं ब्लर करावं लागेल.
सेन्सॉर ह्याच्यावर कात्री लावत नाहीत तर तुमचं कुठे घेऊन बसलात? असं म्हणणारे महाभागही आहेत.पण मग स्त्री कडे पहाण्याच्या दृष्टीचा तुम्ही धडा देताय असच म्हणावं लागेल.चिकनी चमेली हे उदाहरण झालं पण त्याआधीचे सगळेच आयटम साँग म्हणायला गेले तर ह्याच माळेत बसणारे मणी!
संस्कृती ह्या नावाखाली अश्या बुरसटलेल्या विचारांना खतपाणी घालतोय असं अजिबात नाही.पण विभत्स नजरांचा-कपड्यांचा आणि स्वतःच्या अंगावर शहारा आणेल असा डान्स किंवा शृंगार नक्कीच अपेक्षित नाही.स्वतःच्या मुलाला (हल्ली मुलीही मागे नाहीत) गणपती मिरवणूकीत किंवा लग्नात फक्त नाचताना किंवा बाकीच्या मुलाचं अनुकरण करताना बघा आपलाच आपल्याला अर्थबोध होतो. प्रश्न फक्त असा आहे की विडी शिलगावताना दाखवली नाहीत पण शिलगावण्याच्या आधीच्या प्रोसेस पर्यंतच सगळं काही दाखवलत!विडी दाखवली तर मुलं त्याच्या आहारि जातील आणि उन्मत्त डान्स दाखवला तर मात्र बिघडणार नाहीत.
मर्डर,डर्टी पिक्चर ,नि:शब्द अश्या सारख्या पिक्चरना 'ए' 'यु' असं संबोधलं की झालं.पूढे आई-बाबा आणि त्यांच्या मुलांनी ठरवावं काय करायचं ते अश्याच सेन्सॉर बोर्डाच्या भुमिका! पावलं आता आपल्यालाच उचलावी लागणार! आधुनिक पिढी म्हणता म्हणता बरीच मोकळीक मिळाली आणि त्यामुळे बरच काही गमावून बसलोय आम्ही.समथिंग इज पझलिंग! पण आत्ताची पिढी म्हणता म्हणता हे पटत नाही असं म्हणणारे असतील तर आशेला बराच वाव आहे असं म्हणायला हरकत नाही.

शुक्रवार, ८ एप्रिल, २०११

मला सापडलेली कविता . . .





सांगायच असतं काही मला
ऐकणार कोणीही नसतं
जेव्हा कुणी बोलत असतं
समजून घेणार कोणी नसतं
होकार देता देता ऐकणारे सहजपणे
नकार देऊन मोकळे होतात
दिव्याची ज्योत जशी विझावी
तसे हळुच नकळत विझुन जातात
मनाच्या चौकटीत डोकावुन पाहिलं
तर कळलं प्रेमाच्या भाषेबद्दल
प्रेम कुठलही असो,
त्यात असतात बोलणारे,ऐकणारे
आणि समजुन घेणारे सुद्धा!

                        -मयुरा आपटे.

सोमवार, २८ मार्च, २०११

दांडेकर काकुंची रोजनिशी........आजच मेडिटेशन

(ही मिसेस दांडेकर ह्यांची रोजनिशी आहे,छोट्या गोष्टीतही त्यांना खुप समाधान मिळत आणि लहान प्रसंगांना विनोदी स्वरुप देयची सवय आहे त्यांची,त्या सध्या मेडिटेशन करण्यात गुंतल्यात त्या बद्दलच त्यांच्या रोजनिशीतल हे पानं)                    

                       स्व्स्थ बसा . . . डोळे मिटा. . . हळुहळु तुमचं अंग सैल होतय . . तुम्हाला झोप येतेय . . . असं ऐकल्याबरोबर माझ्या बाजुच्या दोन-तीन बायका लगेच पेगांयला लागल्या,मधुन घोरण्याचाही आवाज ऐकु येत होता.छ्या! सगळ्या मेडिटेशनवर पाणी!आपल्याला का नाही लागत अशी झोप?ह्या बायकापण कुठली औषधं घेऊन येतात देव जाणे!हल्ली ह्या सगळ्याच गोष्टींच फॅड निघालय म्हणा-मेडिटेशन काय, स्पा काय -मंडळातल्या बायका जातात असच काहीतरी करायला-त्यांची ती विविध थेर आणि त्यावरच्या गप्पा; आपणही त्यात कमी पडु नये म्हणुन जात नसले तरी महिन्यातुन दोन तीन वेळा जाते असं सांगुन मोकळी होते,उगाच ग्रुपमध्ये एकटं पडायला नको.पण हल्ली आपण किती आणि काय करतो ह्यालाच जास्त महत्त्व,त्यातुन आपल्याला काय मिळालं हा भाग अलहिदाच!
                        बायकांनी स्वतःसाठी,स्वतःच्या सौंदर्य आणि हेल्थ साठी विशेष लक्ष दिले पाहिजे,असं बर्‍याच मासिकात वाचलं.आमची दोन नंबरची कन्यारत्न असच काही वाचत असते.मला अगदी आग्रह करत होती (तिला काहीतरी हवे असणार त्याशिवाय नाही ती एवढा आग्रह करायची)पण आमच्या आयांच्या वेळी कुठले होते हे प्रकार तरी त्यांच्या रुटीन मध्ये काही फरक पडला नव्हता!हे परदेशी फॅड ना! तिथल्या बायका दर शनिवार-रविवार म्हणजे विकएन्ड तिथे जात असतात म्हणे.(म्हणुनच इतक्या गोर्‍यापान दिसतात) शेवटी मंडळातल्या दोन तीन बायकांकडुन त्या सेंटर्सची माहिती काढली आणि ....
                       त्या मेडिटेशन सेंटर मध्ये मी पाऊल टाकल(घरच्यांना न सांगता)! सेंटर एकदम पॉश होतं...सगळीकडे नुसते आरसेच आरसे. . . मागे कुठलतरी मंद संगीत चालु होतं. . मी जरा बिचकतच रिसेप्शनपाशी गेले.अ‍ॅडमिशन घ्येयची असं सांगितल.तीने रितसर प्रवेश प्रक्रिया सुरु केली,वय,नाव,पत्ता,मेडिकल हिस्टरी इ. गोष्टींची विचारपूस झाली,ती ते लिहीपर्यंत मी भितींवर लावलेल्या सेलिबचे फोटो पहात होते.(झोपलेल्या सेलिबना बघण्यात कसला आनंद मिळतो देव जाणे पण स्टेटस वाढत ना!)मी मुद्दाऊन काहींची नाव पाठ करुन ठेवली,सांगायला बरी पडतात.फॉर्म भरुन झाला मग तिने माझ्याकडे फोटो मागितला मी नाही म्हणुन सांगितल,(आमची ही नेहमीचीच गत).सांगितल्याप्रमाणे चेंज करुन आले आणि त्यांच्या मेडिटेशन रूम मध्ये गेले.
                      पहिल्यांदा तिथे सगळ्यांना चादरी वाटण्यात आल्या.जरा भारीतल्याच वाटत होत्या.दोन तीन घरी घेऊन ठेवायला हव्यात.त्या कुलकर्ण्यांच्या सांगत होत्या म्हणे त्यांना चादरींशिवाय मेडिटेशन करताच येत नाही म्हणुन त्यांनी चादरीही लंपास केल्या असं कानावर आल माझ्या.मग मेडिटेशनला सुरुवात झाली.एक अगदी २१-२२ ची छान फिगर असलेली मुलगी आली (मुलांमुळे कळतात काही गोष्टी).आणि तिने आम्हाला ध्यान लावायला सांगितल.डोळे मिटा. . अंग सैल सोडा. . विचार करु नका. . . शांत व्हा हे सगळ अगदी हळू आवाजात म्हणत होती.मग वेगवेगळी आसन झाली,असा हात टाका,पाय जवळ घ्या वगैरे पण किती वेळची मला ती जमतच नव्हती.एन सी सी सोडून किती वर्ष झाली.शेवटी आजुबाजुच्या बायकंनी मदत केली.ती मेडिटेशन वाली बाई मात्र रबर असल्याप्रमाणे पटापट आसन करत होती.तिच्या त्या इंग्रजाळलेल्या मराठीत तिने मला सांगितल काकु फर्स्ट डे आहे ना,एवढ करु नका!तरी मी आपली बेताबेतानेच करत होते.ते सगळ झालं मग आम्हाला जरा पडायला सांगितल,बाकीच्या तर पटापट झोपल्याच,मीच आपली आजुबाजुला बघत बसले होते.मला किती वेळची झोप येत नव्हतीच.शेवटी कंटाळुन उठले आणि चेंज करायला गेले,मला (उगाचच) चेहर्‍यावर तजेला आल्यासारखं वाटल.कपडे पण सैल होत असावेत किंवा तो भास असावा.तिसरा दिवस असुनही फरक जाणवायला लागला होता,बाहेर आले आणि गार ज्युस घेतलं,युथ झाल्यासारख वाटलं ,पण घरच्यांपैकी कोणाला कळु नये म्हणुन नेहमी लवकर पोचते म्हणुन घड्याळ्यात बघितल तर साडे पाच झाले होते,बापरे!हे येण्याची वेळ झाली.साडे पाचला मी घरी असते,तशीच तडक रिक्षा केली आणि घरी आले-हे आले नव्हते,म्हणुन चहा केला तेवढ्यात हे आलेच,मी वेळेवर आले ते एक बर झाल पण तो आनंद फार टिकला नाही,ह्यांना चहा द्यायला गेले तर एकदम म्हणाले 'नंदा हल्ली फ्रेश दिसतेस! क्या राज है इस खुबसुरतीका? काही करतेस का? पुढच पण असच काही म्हणाले(इथे सांगण्यासारख नाही)शेवटी नाइलाजाने त्यांना सगळ सांगाव लागलं आणि तिथे जाणार नाही अस आश्वासन पण दिलं-तर हे मोठमोठ्याने हसायलाच लागले.म्हणतात आमची बायको चिरतरुण दिसणार असेल तर अजुन एक तास तिथे रहायला काहीच हरकत नाही,मी चहा करुन घेत जाईन,वगैरे.
                         मी आपली पहातच राहिले.
                         उद्या मेडिटेशन विथ स्पा साठी सुद्धा चौकशी करनार आहे.

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०११

तिची डायरी......

कधी कधी असं वाटत की काही करुच नये,काही लिहु नये,कोणाशी बोलु नये,काही क्षण आपल्यासाठी घालवावेत,जरा स्वस्त बसावं,शांततेत!ती तिच्य डायरी मध्ये लिहित होती.कॉलेजच्या सेकंड इयरला असुनही तिच्याकडे बघुन कधी अस वाटल नाही की ही कॉलेज मध्ये असेल.सगळेजण नेहमी म्हणायचे तिला की वयापेक्षा मोठी दिसतेस तु.ती फक्त हसायची,कारण त्या पलिकडे त्या गोष्टीवर रिअक्ट होण्यासारख काहिच नव्हतं. तिचे विचार फार प्रगल्भ होते असही नाही पण कदाचित इतर मुलींसारख नॉर्मल वागाव अस तिला कधीच वाटल नाही.कदाचित आयुष्याकडे फार त्रोटकपणे बघत असावी ती.तिचं वर्णन कराव असही कधी कोणाला वाटल नाही किंवा तिने मिळवलेल्या यशाबद्दल खुप कौतुक कराव असही कधी कोणाला वाटल नाही.पण तिच्या यशाबद्दल तिने मिळवलेल्या कतृत्वाबद्दल ती आपल्या डायरीत अगदी सविस्तर पणे लिहुन ठेवायची.जांभळ्या रंगाची,त्यावर फुलांची छान नक्षी असलेली ती डायरी तिने आपल्या वाढदिवसाला खास घेतली होती.पण घेताना एक काळजी मात्र घेतली होती हं तिने,त्या डायरीवर डेट नावाचा प्रकार नव्हता.माझ्या मनातल लिहिण्यासाठी मला तारखेची अडगळ नकोय तिने आर्चिसच्या बॉयला ठासुन सांगितल.तेव्हा तिचं वय साधारण १४-१५ च्या आसपास असावं.सहा वर्ष झाली ती अजुनही त्याच डायरीत लिहिते.कधी मध्येच वाटल तर मागची पान चाळते.पण वाचायच कटाक्षाने टाळते.तिच्यासाठी आज मी डायरीत काय लिहील आहे हे महत्त्वाच कारण.आजचा दिवस शांततेत घालवावसा तिला वाटत होतं.कारण त्याला कारणही तसच होतं.आत्तापर्यंत फक्त तिच्याच असणार्‍या गोष्टींमध्ये तिची डायरी होती पण त्यात आता अजुन कोणीतरी  add  झालेलं होतं अस म्हणुया आपण.आज त्यांच्या मैत्रीला एक वर्ष पूर्ण झालं होतं,आणि एक वर्षात घडुन गेलेल्या गोष्टींचा मागोवा घ्यावा अस तिला वाटत होत.सकाळी  त्याला ११ला भेटण्याची वेळ तिने दिली होती.रात्री १२ वाजल्यापासुनच ती त्याला भेटायला उत्सुक होती त्यामुळे तिला निटशी झोपही लागली नव्हती.त्यांच्या ह्या खास दिवशी त्याला काय भेट द्यावी ह्याचा ति खुप विचार करत होती.एखादा टी-शर्ट अं... नको,एखादा मग ज्यावर खुप छान अस क्वोट असेल,पण नको ते स्पेशल ठरणार नाही.मग आता? आणि हे सगळ डायरीत लिहित असताना तिला एकदम सुचलं.अरे वा!हे खुपच स्पेशल ठरेल!जी गोष्ट फक्त माझी होती ती मी देणार म्हणजे .......खुपच मस्त.सुचलेल्या त्या स्पेशल गिफ्टवर तीच खुप फिदा झाली होती आणि कधी एकदा देतेय अस होउन गेलं होतं तिला.त्याला भेटण्याच्या आधी शेवटच डायरीत लिहुन घ्याव म्हणुन ती डायरी लिहायला बसली.
Dear Dairy,
                    कधी कधी असं वाटत की काही करुच नये,काही लिहु नये,कोणाशी बोलु नये,काही क्षण आपल्यासाठी घालवावेत,जरा स्वस्त बसावं,शांततेत!खर तर अस कधीच नव्हत वाटल गं,पण आज ते वाटतय ह्याला कारणही तसच आहे.आज आम्हाला वर्ष पूर्ण झाल.काय काय घडलय ह्या एका वर्षात ह्याचा विचार करताना खुप मस्त वाटतय.आपली एखादी हरवलेली वस्तु मिळाल्या नंतर जो आनंद होतो ना तस काहीस झालय माझं.तो खरच आहे ग तसा.खुप काळजी घेतो माझी.(आत्ता पर्यंत हे वाक्य १५० वेळा डायरीत येउन गेलय पण तरी....)आज मी मुद्दाउन आधीची सगळी पान वाचली.परत वाचायला मिळतील नाही मिळणार.खुप फरक पडलाय!हो,आधी पेक्षा जास्त मोठी झालेय मी पण त्याला पर्याय नाही.आधी फक्त मी माझीच होते पण दुसर्‍यासाठी काहीतरी होण ह्याने खुप बर वाटत!आपल्या गोष्टींमुळे,आपल्या सुख-दु:खांमुळे कोणाला तरी फरक पडतोय हे पहाताना खुप बर वाटत.आधी कधी अनुभवच आला नव्हता ना असा पण आता तो येतोय त्यामुळे त्याचं अप्रुप जास्त आहे.आज ११ला भेटणार आहे मी त्याला!नवीन ड्रेस घालुन जाणार आहे.मस्त कुठेतरी जेउ.भटकु.मजा करू!बस अजुन काय ? आज त्याला मी मोठ गिफ्ट देणार आहे.तुलाही सरप्राईज असेल ते! घाबरू नकोस!एवढ काही खास नाहीये पण तरी......हल्ली माझं लिहीण खुप कमी होतय!हं........राहुदे!तु रागवु नकोस फक्त!नेहमी आणि माझ्या बरोबर रहा.चल मी आवरते.बाय.......                    

                                                                                                                                                                              तुझीच

P.S. :-तुला निट रॅप करून त्याच्याकडे देयच आहे कायमसाठी!माझी आठवण काढ.आणि निट रहा.काळजी घे.तो सुद्धा आपलाच आहे.राहशील ना?त्याच्याशी बोलताना काही राखुन ठेवु नकोस.तो खुप काळजी घेईल तुझी.(तुझी खुशाली त्याच्याकडुन घेत राहीन)बाय.मी मिस करेन तुला.तु  सर्वस्व आहेस आणि आज मी ते माझ्याच सर्वस्वाकडे देतेय.

बुधवार, २ फेब्रुवारी, २०११

मला सापडलेली कविता.........

(मला सापडलेली ही कविता माझ्या बहिणीच्या कप्प्यात होत,कविता ज्या पद्धतीने लिहिली गेली होती त्यावरुन तिच वय फार मोठ वाटत पण ती फक्त १२ वर्षांची आहे.ही कविता मला खुप भावली,ती फक्त तिची आहे म्हणुन नव्हे तर त्यातला आशय तिच्या वयाच्या मानाने फार मोठा आहे.म्हणुन मला सापडलेली तिची ही कविता......)
 दु:ख
एखादं कोणीतरी असतं
जे आपल्याला दुरून दिसत असतं
गुलाबाच्या काट्याप्रमाणे
हळुच कोणीतरी टोचत असतं
एखादा भावस्पर्श होतो.
कोणीतरी पटकन निघुन जातं
असं वाटत सारं जगच आपल्याला सोडुन गेलयं
कोणीतरी रडत असतं,पण एकु येत नसत.
पटकन कोणीतरी भेटुन जात
आपला सुगंध बरोबर देऊन जातं.
अचानक सगळच नष्ट होतं
अचानक रडण्याचा आवाज येतो
पण कोणाचच लक्ष नसतं
तो/ती असते/असतो
मी एकटीच कुठेतरी फिरत असते.....
                                              -मयुरा आपटे.

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

ती दोघं.........

                         आमच्या वाड्याच्या समोर एक छोट बैठ घर आहे.छान लाकडाचं काम असलेलं,पडवीत झोपाळा,मोठ अंगण,कौलारू जरा जुनाट बांधणीचं घर आहे.तिथे पूर्वी एक वयोवृद्ध जोडपं रहायच.आमच्यासाठी ते अप्पा आणि आजीच होते.त्यांना मुल नव्हतं त्यामुळे आम्हीच त्यांची मुलं,नातवंड,जिवलग मित्र होतो.त्यामुळे आजीच्या लाडाला पण ऊत यायचा.ती दोघ आम्हाला घरच्यांपेक्षा जास्त जवळची वाटायची.दिवस रात्र आम्ही त्यांच्या पडीक असायचो तरीही ओरडण नाही की काही नाही.त्यांच्या घरासमोर मोठं अंगण होतं आणि त्याला लागुनच सागाच्या लाकडातला मोठा झोपाळा होता.त्यावर बसुन अप्पा आम्हाला गोष्टी सांगायचे.मग आजीने केलेल्या खोबर्‍याच्या वड्या,वाळत घातलेल्या चिकोड्या,गुळ-खोबर  हाच आमचा खुराक.मे महिन्यात तर खाऊला अगदी ऊत यायचा.आंबा पोळी,फणस पोळी,आमरस आणि काय  काय मजा असायची.आमचा दुपारचा वेळ पत्ते खेळण्यात आणि संध्याकाळी लपाछपी,पकडापकडी आणि बरोबर चमचमीत खायला काहीतरि असा एकुण जात असे.परिक्षेच्या वेळेला मुद्दाऊन आजी-अप्पांकडे अभ्यासाला जायचो.कारण अप्पा गणित फार छान शिकवायचे तर आजी संस्कृत.अप्पा हसत-खेळत शिकवायचे,तर आजीचा धाक मात्र तेवढाच होता.उद्या देव पाठ झाला पाहिजे म्हटल्यावर तो व्हायचाच!परिक्षेचा रिझल्ट घेऊन घरी गेलो की आमच्यासाठी खास खरवसाचा बेत असायचा.
                          आज ते घर पाहिलं की हे सगळ आठवतं!त्या बाहेरच्या झोपाळ्यावर बसुन आम्ही मोठ मोठ्याने रामरक्षा,मारुती स्तोत्र म्हणलीयेत,अप्पांचा आवाज अगदी खर्जातला लागायचा तो एकताना मन अगदी मन गुंगुन जायचं.सकाळी शाळेत जाताना अप्पा झोपाळ्यावर पेपर वाचत बसलेले दिसायचे.आतुन आजी मात्र त्यांना "अहो,अंघोळ उरकून घ्या!" अस म्हणत असायची.हे नेहमीच ठरलेल होतं.आणि ते एकल्याशिवाय आमचा दिवस सुरू होत नसे.
                           आजी गेल्यापासुन अप्पांनी झोपाळ्यावर बसायचच सोडुन दिलय,चाक निखळुन रथ कोलमडावा तसं त्यांचं झालं होतं.सतत घरात काहीतरी शोधत असतात.हळुहळु आमच ही जाण कमी होत गेलं ,पण मी खास वेळ काढुन भेटायला जातेच!हल्ली बघवत नाही त्यांच्याकडे.आयष्याची संध्याकाळ अशीच असते असं मला सांगत रहातात.निदान मांणसांची ओळख विसरलेले नाही हेच माझ्यासाठी खुप होतं.ते दिवसभर काय करतात,त्यांच्या जेवणा-खाण्याचं काय करतात,तब्येत कशी आहे असे काळजीने प्रश्न विचारणारे खुप होते,पण त्यांनी जगापासुन स्वतःला पूर्ण पणे वेगळ करुन घेतल होतं.
                         आता त्या घराकडे पाहिलं की मन उदास होतं,कारण त्या घरातली ती दोघ मला दिसत नाहीत,झोपाळ्याच्या गंजलेल्या साखळ्यांची करकर तेवढी एकु येते.

बुधवार, २६ जानेवारी, २०११

खिडकी

नेहरु फेस्टिव्हल मध्ये ज्योती सुभाष ह्यांच खिडक्या हे नाटक पाहिलं.आजी व नातवाच्या सुंदर नात्यावर कथा गुंफली आहे.नातवाच्या सुरेख आठवणींपासुन दूर जाणारी आजी व धडपडत असलेला नातू याचं सुंदर सादरीकरण केलेलं आहे.नाटकाचं शिर्षक खिडक्या आहे असं एकल्यावर मला आमच्या वाड्याच्या माडीवरची खिडकी आठवली.सागाच्या लाकडात सुंदर कोरीव काम केलेली,जमिनी पासुन थोड्याच उंचीवर असलेली थोडीशी बसकी अशी ती खिडकी खुप छान आहे.लहानपणी ना मल ती खुप आवडायची कारण फक्त त्याच खिडकीतुन खाली पहाण्यासाठी माझी उंची पुरायची.पण मग नंतर हळुहळू मला तो छंदच जडला आणि त्या छंदाच रुपांतर सवयीत झालं आणि मग तो नित्यक्रमच झाला.रात्री झोपण्याच्या आधी खिडकीत जाऊन चांदण्या बघायच्या आणि त्याने मन भरल की मगच खाली झोपायला पळायचं.खर सांगायचं तर 'ह्या' खिडकीशी माझ्या खुपशा आठवणी जोडलेल्या आहेत.त्या खिडकीतुन मी गणपतीच्या मिरवणूकी पाहिल्या आहेत,दिंडी,प्रभात फेर्‍या पाहिल्या आहेत,अगदी दंगलही 'त्या' खिडकीच्या फटीतुन बघितल्या आहेत.त्या खिडकीने माझी खुपशी दु:ख शेअर केलेली आहेत.कितीतरी वेळा माझ्या अश्रृंनी तिची सागाची पट्टी ओली झालेली आहे.जगाकडे नेहमी उघड्या नजरेने बघत रहा असं ती मला सांगतेय असच वाटायच मला.हे सगळ आठवल ना की गहिवरुन येत.पण मग कधीतरी मनात विचार येतो,की उद्या मोठं झाल्यावर,रुटिन मध्ये बिझी झाल्यावर,लग्न होऊन सासरी गेल्यावर,मला ह्या खिडकीची आठवण आली असती का?कदाचित नाही किंवा कदाचित माझ्या म्हातारपणात मी परत ह्या खिडकिकडे आलेही असते,पण मग तेव्हा वाटल असतं की आता फक्त चौकटी राहिल्यात आतला गाभा मात्र कधीच गळून पडलाय!