मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

ती दोघं.........

                         आमच्या वाड्याच्या समोर एक छोट बैठ घर आहे.छान लाकडाचं काम असलेलं,पडवीत झोपाळा,मोठ अंगण,कौलारू जरा जुनाट बांधणीचं घर आहे.तिथे पूर्वी एक वयोवृद्ध जोडपं रहायच.आमच्यासाठी ते अप्पा आणि आजीच होते.त्यांना मुल नव्हतं त्यामुळे आम्हीच त्यांची मुलं,नातवंड,जिवलग मित्र होतो.त्यामुळे आजीच्या लाडाला पण ऊत यायचा.ती दोघ आम्हाला घरच्यांपेक्षा जास्त जवळची वाटायची.दिवस रात्र आम्ही त्यांच्या पडीक असायचो तरीही ओरडण नाही की काही नाही.त्यांच्या घरासमोर मोठं अंगण होतं आणि त्याला लागुनच सागाच्या लाकडातला मोठा झोपाळा होता.त्यावर बसुन अप्पा आम्हाला गोष्टी सांगायचे.मग आजीने केलेल्या खोबर्‍याच्या वड्या,वाळत घातलेल्या चिकोड्या,गुळ-खोबर  हाच आमचा खुराक.मे महिन्यात तर खाऊला अगदी ऊत यायचा.आंबा पोळी,फणस पोळी,आमरस आणि काय  काय मजा असायची.आमचा दुपारचा वेळ पत्ते खेळण्यात आणि संध्याकाळी लपाछपी,पकडापकडी आणि बरोबर चमचमीत खायला काहीतरि असा एकुण जात असे.परिक्षेच्या वेळेला मुद्दाऊन आजी-अप्पांकडे अभ्यासाला जायचो.कारण अप्पा गणित फार छान शिकवायचे तर आजी संस्कृत.अप्पा हसत-खेळत शिकवायचे,तर आजीचा धाक मात्र तेवढाच होता.उद्या देव पाठ झाला पाहिजे म्हटल्यावर तो व्हायचाच!परिक्षेचा रिझल्ट घेऊन घरी गेलो की आमच्यासाठी खास खरवसाचा बेत असायचा.
                          आज ते घर पाहिलं की हे सगळ आठवतं!त्या बाहेरच्या झोपाळ्यावर बसुन आम्ही मोठ मोठ्याने रामरक्षा,मारुती स्तोत्र म्हणलीयेत,अप्पांचा आवाज अगदी खर्जातला लागायचा तो एकताना मन अगदी मन गुंगुन जायचं.सकाळी शाळेत जाताना अप्पा झोपाळ्यावर पेपर वाचत बसलेले दिसायचे.आतुन आजी मात्र त्यांना "अहो,अंघोळ उरकून घ्या!" अस म्हणत असायची.हे नेहमीच ठरलेल होतं.आणि ते एकल्याशिवाय आमचा दिवस सुरू होत नसे.
                           आजी गेल्यापासुन अप्पांनी झोपाळ्यावर बसायचच सोडुन दिलय,चाक निखळुन रथ कोलमडावा तसं त्यांचं झालं होतं.सतत घरात काहीतरी शोधत असतात.हळुहळु आमच ही जाण कमी होत गेलं ,पण मी खास वेळ काढुन भेटायला जातेच!हल्ली बघवत नाही त्यांच्याकडे.आयष्याची संध्याकाळ अशीच असते असं मला सांगत रहातात.निदान मांणसांची ओळख विसरलेले नाही हेच माझ्यासाठी खुप होतं.ते दिवसभर काय करतात,त्यांच्या जेवणा-खाण्याचं काय करतात,तब्येत कशी आहे असे काळजीने प्रश्न विचारणारे खुप होते,पण त्यांनी जगापासुन स्वतःला पूर्ण पणे वेगळ करुन घेतल होतं.
                         आता त्या घराकडे पाहिलं की मन उदास होतं,कारण त्या घरातली ती दोघ मला दिसत नाहीत,झोपाळ्याच्या गंजलेल्या साखळ्यांची करकर तेवढी एकु येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा